चिपळूण: चिपळूण तालुका हद्दीतील मौजे तांबी पुलाजवळ दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.२५ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीचालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला. होंडा ॲक्टिव्हा स्कुटर (क्रमांक एम.एच.०८-बी.जी.-५३१८) चालवणारा पुरुषोत्तम यशवंत कदम (वय ६०, रा. पाटपन्हाळे, ता. गुहागर) याने आपला निष्काळजीपणा आणि अतिवेग यामुळे समोरून येणाऱ्या टोयोटा हायरायडर गाडीला (क्रमांक एम.एच.०८-बी.ई.-५५०४) जोरदार धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम कदम हे आपली स्कुटर भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवत होते. तांबी येथील रस्ता अरुंद असून पूल असल्यामुळे अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असताना, त्यांनी परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांची स्कुटर विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या टोयोटा हायरायडर गाडीच्या उजव्या बाजूला धडकली आणि घासत गेली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात स्कुटर चालक पुरुषोत्तम कदम स्वतः किरकोळ जखमी झाले, तर त्यांच्या पाठीमागे बसलेले अजित अनंत कदम (वय ४०, रा. पाटपन्हाळे, ता. गुहागर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय रामचंद्र शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुरुषोत्तम कदम यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कायदा कलम २८१, तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. स्कुटर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.





