GRAMIN SEARCH BANNER

पैसे घेऊन केलं जातं ते मतदान नसून मत विक्रीच,सुहास खंडागळे यांच्या हल्लाबोल

Gramin Varta
100 Views

मतांसाठी पैसे घेणे ही ‘आधुनिक गुलामगिरी’;नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडागळे यांनी मांडली भूमिका

देवरूख:“पैसे घेऊन केलं जातं ते मतदान नसून मत विक्रीच, असा हल्लाबोल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी निवडणुकीतील पैशांच्या राजकारणावर केला आहे.निवडणुकीच्या काळात मतांसाठी पैसे घेणे म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची विक्री करणे होय. ही एक प्रकारची ‘आधुनिक गुलामगिरी’ असून मतदारांनी आता यातून बाहेर पडायला हवे,” असे रोखठोक प्रतिपादन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना पैशांच्या आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ संदेशाद्वारे संवाद साधताना खंडागळे यांनी सध्याच्या निवडणूक पद्धतीवर आणि पैसे वाटणाऱ्या प्रवृत्तीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “पाच वर्षातून एकदा हे नेते येतात आणि मतांसाठी काही हजार रुपये देतात. मात्र, एकदा पैसे घेतले की पुढील पाच वर्षे मतदारांना त्या नेत्याच्या मागे लाचार होऊन फिरावे लागते. आपल्या कष्टाच्या पैशावर आपण घर चालवतो, मग मतांसाठी पैसे घेऊन आपण पाच वर्षांची गुलामगिरी का पत्करायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचा दाखला दिला. ते म्हणाले, “आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ‘दान’ करण्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच या प्रक्रियेला ‘मतदान’ म्हटले जाते. मात्र, जर त्यासाठी पैसे घेतले जात असतील, तर ते ‘मतदान’ नसून ती ‘मतविक्री’ ठरते. ज्याचे विचार तुम्हाला पटतात, त्याला हक्काने मत द्या, पण पैशांच्या बदल्यात मत देऊन लोकशाहीतील या पवित्र हक्काचा बाजार मांडू नका.” असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.

मतदारांनी आता सजग होण्याची गरज असल्याचे सांगताना खंडागळे म्हणाले की, जो उमेदवार निवडणुकीत प्रचंड पैसे खर्च करतो, तो निवडून आल्यावर तुमची कामे करेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे उमेदवाराचे विचार आणि विकासाचे व्हिजन पाहूनच मतदान करा.
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने नेहमीच या अनिष्ठ प्रथेविरोधात आवाज उठवला आहे. लोकांच्या भविष्याचा विचार करून आणि त्यांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी गाव विकास समिती कटिबद्ध असल्याचेही सुहास खंडागळे यांनी शेवटी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3369517
Share This Article