GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Gramin Varta
233 Views

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव येथे मंगळवारी सकाळी रस्त्याच्या कडेला अंदाजे सात ते आठ महिन्यांची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञात वाहनाच्या धडकेने तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

रस्त्यालगत मृत बिबट्या दिसताच ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार वनपाल उदय भागवत आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली.

खाडीपट्टा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. यापूर्वी मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याची नोंदही झाली होती. आता रस्त्यालगत बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

भक्ष्याच्या शोधात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. मृत बिबटीचे शवविच्छेदन करून त्यास विल्हेवाट लावण्यात आली असून, वनविभागाचे अधिकारी सायंकाळपर्यंत तपासकार्यात गुंतले होते.

Total Visitor Counter

3366874
Share This Article