GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसी स्फोटातील आणखी एकाचा मृत्यू; मृतांची संख्या तीनवर

Gramin Varta
170 Views

खेड: लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान केमिकल कंपनीत ६ मार्च रोजी झालेल्या भीषण रिअॅक्टर स्फोटाची जखम दिवसेंदिवस अधिकच गडद आणि वेदनादायी होत चालली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या ११ कामगारांपैकी सुजन गोपाल दास या २९ वर्षीय तरुणाचा सोमवारी ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मूळचे बंगालचे असलेले आणि गेल्या तीस वर्षांपासून आवाशी येथे स्थायिक झालेल्या दास कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच सुजनच्या बहिणीचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता; मात्र लग्नाचा आनंद ओसरण्यापूर्वीच सुजनच्या निधनाची बातमी धडकल्याने संपूर्ण आवाशी गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या भीषण स्फोटाने केवळ कंपनीचे छप्परच उडवले नाही, तर कामगारांच्या आयुष्याचीही राखरांगोळी केली आहे. अंगावर गरम रसायन पडल्याने गंभीर जखमी झालेल्यांपैकी यापूर्वीच मुरडे गावचे रघुनाथ खंदू खामकर आणि लातूरचे असद खान या दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, आता सुजनच्या रूपाने तिसरा बळी गेला आहे. उर्वरित जखमी कामगारांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या एकापाठोपाठ एक होत असलेल्या मृत्यूंमुळे लोटे परिसरातील औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

वडील गोपाल दास यांनी ठेकेदारी करून कष्टाने उभे केलेले घर आणि मुलांचे याच परिसरात पूर्ण झालेले शिक्षण, असा या कुटुंबाचा आवाशीमधील तीस वर्षांचा ऋणानुबंध आज एका अपघाताने विखुरला गेला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण कामगार वर्गात सध्या भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षिततेबाबत आता प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जाण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3351260
Share This Article