मुंबई: एकीकडे आयपीएल सुरू असताना कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा कानपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी पाच सट्टेबाजांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ९१ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.
विशेष म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून, या टोळीचा मास्टरमाइंड मनीष ऊर्फ ‘प्रोफेसर’ हा महाराष्ट्रातून हे नेटवर्क चालवत होता. Bet Hub 24 नावाच्या ॲपद्वारे हे रॅकेट हायटेक पद्धतीने सुरू होते. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सध्या पोलीस फरार ‘प्रोफेसर’चा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या संत नगर चौक परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना या रॅकेटची टीप मिळाली. गोविंद नगर पुलाखाली एका कारमध्ये बसून काही तरुण मोबाईल ॲपद्वारे आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कार्तिक लखवानी आणि राजकुमार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाईलची झडती घेतली असता सट्टेबाजीचा हा प्रकार समोर आला.
अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी किदवई नगरमधील एका भाड्याच्या घरावर छापा टाकला. या ठिकाणी कल्पेश, रवि नाई आणि विष्णू (सर्व गुजरातचे रहिवासी) हे तिघे मोबाईलवरून सट्टा चालवताना रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी जेव्हा घराची झडती सुरू केली, तेव्हा तिथे नोटांचे बंडल्स देखील होते. या छाप्यात ३ कोटी ९१ लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सट्टेबाजीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कामासाठी तरुणांना १३ ते २० हजार रुपये पगारावर ठेवले जायचे. एक लाखापर्यंतचे व्यवहार ऑनलाईन होत असत, मात्र त्यापुढील सर्व देवाणघेवाण ही केवळ कॅशने केली जात असे, अशी कबुली ताब्यात घेतलेल्यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे कानपूर पोलिसांनी हे प्रकरण आता आयकर विभागाकडे सोपवले आहे. जप्त केलेली रक्कम आयकर विभागाच्या स्वाधीन केली जाणार आहे.
कानपूर पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजीच्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून, पाच आरोपींना अटक केली आहे आणि ३.९१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार, ज्याला ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखले जाते, तो महाराष्ट्रातून एका मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून रिमोटली हे नेटवर्क चालवत होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आयकर विभागाकडे सोपवला असून, या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या पथकासाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.






