GRAMIN SEARCH BANNER

लांजा येथील महामार्गालगत उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Gramin Varta
378 Views

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लांजा येथील गोंडेसखलकडे जाणाऱ्या रस्त्यावर, नवीन पुलाच्या बांधकामाजवळ उघड्यावर गॅस शेगडीचा वापर करून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भररस्त्यात ज्वलनशील पदार्थांचा हयगयीने वापर केल्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आणि पुलाच्या बांधकामामुळे लांजा परिसरात अनेक ठिकाणी पर्यायी रस्ते वापरले जात आहेत. गोंडेसखलकडे जाणाऱ्या मार्गावर वैशाली चंद्रकांत रसाळ (वय ५०, रा. गुरववाडी, लांजा) ही महिला सार्वजनिक रस्त्याला लागूनच उघड्यावर गॅस सिलेंडर आणि शेगडी लावून खाद्यपदार्थ बनवून ग्राहकांना विकत होती. ज्या ठिकाणी हे पदार्थ बनवले जात होते, तो परिसर वर्दळीचा असून तिथे महामार्गाचे बांधकामही सुरू आहे. उघड्यावरील या शेगडीमुळे किंवा सिलेंडरमुळे अचानक आग लागून तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना गंभीर दुखापत होण्याची किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची मोठी भीती निर्माण झाली होती.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आनंदा कळंत्रे (वय ७२६) यांनी स्वता: फिर्यादी होऊन पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित महिला वैशाली रसाळ हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम २८७ नुसार मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील पदार्थांची हाताळणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. महामार्ग परिसरात अशा प्रकारे बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असून, सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3392547
Share This Article