GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: एकाकीपणाला कंटाळून वृद्धाची गडनदीत उडी मारून आत्महत्या; धामापूर येथील धक्कादायक घटना

संगमेश्वर/एजाज पटेल : तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर येथे एका ७५ वर्षीय वृद्धाने मानसिक तणावातून गडनदीच्या पात्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे निधन आणि मुलांचे शहरात वास्तव्य यामुळे निर्माण झालेल्या एकाकीपणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रामचंद्र रावजी महाडीक (वय ७५, रा. धामापूर) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

संगमेश्वर पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र महाडीक हे धामापूर येथील आपल्या मूळ गावी एकटेच राहत होते. त्यांच्या पत्नीचे काही काळापूर्वी निधन झाले होते, तर मुले नोकरी-धंद्यानिमित्त शहरात वास्तव्यास आहेत. घरामध्ये कोणीही सोबत नसल्याने रामचंद्र यांना प्रचंड एकाकीपणा जाणवत होता. याच मानसिक दडपणाखाली ते गेल्या काही दिवसांपासून वावरत होते. २१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही कल्पना न देता ते घरातून निघून गेले होते.

महाडीक घरात दिसले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी परिसरात शोधाशोध सुरू केली होती. मात्र, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास धामापूर येथील ‘निमरीपार’ भागातील गडनदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

या घटनेची माहिती मयताचा मुलगा मंगेश रामचंद्र महाडीक (वय ४६, सध्या रा. सावर्डे, चिपळूण) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माखजन पोलीस दूरक्षेत्राला दिली. मयताच्या मुलाने दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू रजि. नं. १७/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा सविस्तर जाहीर रिपोर्ट देवरूख येथील कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी फौजदार आर. एस. गावित या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका वृद्ध व्यक्तीने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे धामापूर आणि संगमेश्वर परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3485114
Share This Article