GRAMIN SEARCH BANNER

दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने महाबळेश्वर वाईमार्ग चार दिवस बंद

रायगड :रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा असलेला पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सुरूर या मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दरडी कोसळण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून  सदरचा मार्ग शनिवार आणि रविवार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलादपूर तहसीलदार यांच्याकडून कळविण्यात आली आहे.

पोलादपूर ,महाबळेश्वर ,वाई या आंबेनळी घाटातून जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे काम आर.पी.पी एम.आय.पी. एल. यांच्या मार्फत करण्यात येत असून सदरचे काम प्रगतीपथावर असल्याचे कळविण्यात आले आहे. हा मार्ग आंबेनळी घाटातून जात असून पायटा या गावापासून महाबळेश्वर कडे जाताना एक किलोमीटर अंतरावर दरड प्रवण क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये डोंगरातील दरड माती रस्त्यावर येत आहे, आलेली माती आणि दरड काढण्याचे काम सुरू असून येत्या तीन-चार दिवसांमध्ये हा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात येणार आहे. यासाठी चार दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मार्गावर दरडी कोसळत असल्याने अपघात होण्याची शक्यता असून सुरक्षिततेच्या उपाय केले जात असून अवजड वाहन बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे, त्याचबरोबर शनिवार आणि रविवार महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये प्रमाणा पेक्षा अधिक वाढ होत असल्यामुळे घाट मार्गावर वाहतूक कोंडी वारंवार होत असून  पर्यटकांनी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या मार्गावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलादपूर आपत्कालीन निवारण कक्षा कडून रस्त्यावर आलेली माती व दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. घाट मार्गावर दरड कोसळण्याची माहिती समजतात पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, पोलीस निरीक्षक आनंद रावडे, यांच्यासह तहसील तसेच पोलीस विभागातील कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. घाट मार्गातील अडथळे यंत्रणे मार्फत दूर करण्यात आल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेकडून देण्यात आली.

Total Visitor Counter

2475129
Share This Article