चिपळूण : दिनांक ५ ऑक्टोबर १७३३ रोजी चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील गोविंदगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्यासाठी झालेल्या ऐतिहासिक रणसंग्रामाची २९२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिपळूणमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या लढाईत पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे नातू आनंदराव गोळे, त्यांचे दहा बंधू आणि शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करत बलिदान दिले होते. त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘गोविंदगड रन मॅरेथॉन’ स्पर्धा आणि ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
गोविंदगड रन मॅरेथॉन स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली – लहान गट (मुले-मुली) आणि खुला गट (मुले-मुली). या स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गट मुलांमध्ये पवन गौडने प्रथम, वीर पांडुरंग मेटकरने द्वितीय, तर यतींद्र रोहिदास पारधीने तृतीय क्रमांक पटकावला. लहान गट मुलींमध्ये इच्छा हरिचरण राजभर प्रथम, रिद्धी सुनील भालेकर द्वितीय, आणि अनुष्का अंकुश खेराडे तृतीय आली. खुला गट मुलांमध्ये ओंकार विष्णू बैकर प्रथम, सुरज सुरेश कदम द्वितीय, आणि यश मंगेश शिर्के तृतीय आला. तर खुला गट मुलींमध्ये प्रमिला पांडुरंग पाटीलने प्रथम, तन्वी भिकाजी मल्हारने द्वितीय, आणि श्रुतिका सुभाष वरकने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हॉल, चिपळूण येथे ऐतिहासिक गोविंदगड लढाईवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चिपळूणचे प्रांताधिकारी श्री. आकाश लिगाडे, प्रमुख वक्ते शिव व्याख्याते श्री. बालाजी काशिद, सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे १४वे वंशज श्री. मारुती आबा गोळे, तसेच श्री. योगेश आंब्रे, श्री. विजय भिलारे, श्री. मिलिंद कापडी, श्री. रामशेठ रेडीज, श्री. बापू काणे, श्री. मोहन मिरगल, गायकवाड सरदारांचे वंशज ऋषिकेश गायकवाड, निवृत्त पोलीस अधिकारी गणेश गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विशाल राऊत यांनी केले. प्रांताधिकारी श्री. लिगाडे सर व इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते श्री. बालाजी काशिद यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत ५ ऑक्टोबर १७३३ च्या रणसंग्रामाचा सविस्तर इतिहास उपस्थितांसमोर उभा केला. गोळे घराण्याचा शौर्यगाथा, मावळ्यांचा त्याग व गोविंदगडाचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले. या कार्यक्रमाला गडप्रेमी, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठानचे शिलेदार श्री. आशिष कानापडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. इतिहासाची उजळणी करत नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम चिपळूणकरांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला.
गोविंदगड रणसंग्रामाच्या २९२व्या स्मृतीदिनानिमित्त चिपळूण येथे मॅरेथॉन व व्याख्यानाचे आयोजन
