खेड: तालुक्यातील भरणे-साखरोली-वाकवली या राज्य मार्ग क्रमांक १६२ च्या रुंदीकरण कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप करत, खेड शहर भारतीय जनता पक्षाने याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवून विकास आराखड्यानुसार (डीपी) रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी यांनी दिला आहे. या संदर्भातील एक निवेदन खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
या रस्त्याचे रुंदीकरण आणि कामासाठी १३८.०६ कोटी रुपये मंजूर असून याची निविदा रक्कम १०३ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, सध्या सुरू असलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस पद्धतीने होत असल्याचा थेट आरोप भाजपने केला आहे. खेड नगरपरिषद हद्दीतील काही ठराविक लोकांना आर्थिक किंवा वैयक्तिक फायदा पोहोचवण्यासाठी विकास आराखड्या डावलून रस्त्याची रुंदी कमी केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे न हटवताच प्रशासनाकडून रस्त्याचे काम पुढे ढकलले जात असल्यामुळे शहरातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे या मार्गावर दररोज सकाळी दोन ते तीन तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. हा रस्ता आताच विकास आराखड्यानुसार रुंद केला गेला नाही, तर पुढील पन्नास वर्षे या रस्त्याचे रुंदीकरण करणे शक्य होणार नाही, अशी भीतीही साळवी यांनी व्यक्त केली आहे. काही राजकीय दबावापोटी या रस्त्याचे रुंदीकरण जाणीवपूर्वक रोखले जात असल्याचे सांगत, या संपूर्ण प्रकाराला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.
या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तातडीने कडक कारवाई करावी, मार्गातील सर्व अतिक्रमणे तात्काळ जमीनदोस्त करावीत आणि रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भाजप स्टाईलने तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हे निवेदन देताना भाजप शहराध्यक्ष भालचंद्र साळवी यांच्यासह भाजप नगरसेवक तथा गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, खेड शहर उपाध्यक्ष प्रणव महापुस्कर, राहुल पाटणे, शैलेश धारिया, स्वराज गांधी आणि सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







