सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांचा आंदोलनाचा इशारा
राजापूर: तालुक्यातील आंगले गावातील सौंदळकर वाडी येथे बसवण्यात आलेले इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर सध्या अत्यंत दुरवस्थेत असून ते अखेरची घटका मोजत आहे. हे ट्रान्सफॉर्मर ज्या लोखंडी पोलांवर उभे आहे, ते पोल जमिनीलगतच्या भागापासून पूर्णपणे गंजले आहेत. त्यामुळे हे पोल कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे महावितरणने काही प्रमाणात अतिशय धोकादायक असलेले पोल बदलले आहेत. मात्र, सौंदळकर वाडी येथील दोन पोल बदलण्याचे काम अजूनही बाकी आहे.
सौंदळकर वाडी सोबतच परिसरातील इतर वाड्यांमध्येही विजेच्या खांबांची बिकट अवस्था झाली आहे. सरवणकर वाडी येथे सुद्धा नवीन दोन ते तीन पोल बसवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कातलवाडी येथील सुभाष तिलोटकर यांच्या घराशेजारी असलेले एक ते दोन पोल अत्यंत धोकादायक स्थितीत उभे असून ते कधीही कोसळू शकतात. आगामी पावसाळा तोंडावर असल्याने, त्यापूर्वी या सर्व वाड्यांमधील उर्वरित व धोकादायक पोल बदलण्याचे काम महावितरणने तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी विलास राऊत यांनी केली आहे.
या संदर्भात महावितरण कार्यालय राजापूर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत विलास राऊत यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत महावितरणने यावर योग्य ती कारवाई न केल्यास, गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण किंवा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने आम्हाला अशा टोकाच्या मार्गाचा अवलंब करायला लावू नये आणि पावसाळ्यापूर्वी हे सर्व काम पूर्ण करावे, अशी विनंतीही त्यांनी बोलताना केली आहे. महावितरण आता या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने पाहते आणि पावसाळ्यापूर्वी हे सर्व पोल बदलते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






