GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये जनावरांच्या वाहतुकीवरून दोन गटात राडा; नारंगी फाट्यावर हाणामारी, परस्पर गुन्हे दाखल

Gramin Varta
38 Views

खेड : तालुक्यातील नारंगी फाटा परिसरात जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून दोन गटांत झालेल्या हिंसक वादात लोखंडी पाईप आणि बांबूने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पहिली घटना १३ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली, ज्यामध्ये फिर्यादी ऋतिक सुनील जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाला गाडीमध्ये गुरे भरल्याच्या संशयावरून आरोपींनी नारंगी फाट्याजवळ अडवून वाद घातला. यावेळी झालेल्या मारहाणीत आरोपींनी ऋतिक यांच्या भावाच्या कपाळावर कोणत्यातरी साधनाने वार करून जखमी केले, तसेच ऋतिक यांच्या खांद्यावर बांबूने प्रहार करून मारहाण केली. या प्रकरणी त्रुपेश निंबाळकर, रिक्षाचालक चव्हाण आणि खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेनंतर काही वेळातच दुसऱ्या गटाकडून प्रसाद प्रकाश बर्गे यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने ते आपल्या सहकाऱ्यांसह जात असताना नारंगी फाट्यावर त्यांनी सूरज जाधव याला अडवून विचारणा केली. याचा राग आल्याने सूरज आणि ऋतिक जाधव या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी लोखंडी पाईपने मारहाण करत प्रसाद यांना पुलावरून ढकलून दिल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जाधव बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गटांतील वादात एकूण सहा जण जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3385896
Share This Article