GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
330 Views

संगमेश्वर : तालुक्यातील साडवली येथील तुळजाभवानीनगर परिसरात आज बुधवारी सकाळी दुर्दैवी अपघात घडला. दुचाकीला ओव्हरटेक करताना बोलेरो वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला. मनोहर आत्माराम मेस्त्री (वय ७०, रा. सांगवे वरचीवाडी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम रामकृष्ण मेस्त्री हे आपल्या हीरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरून चुलते काका मनोहर मेस्त्री यांना कोसुंब येथून साडवलीच्या दिशेने घेऊन जात होते. त्याच वेळी प्रतिक नरेश शिंदे (वय २५, रा. मुंबई) हे महेंद्रा बोलेरो वाहनातून संगमेश्वरहून देवरुखकडे निघाले होते. साडवलीतील वनाज कंपनीजवळील तुळजाभवानीनगर परिसरात आले असता बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने दुचाकीला मागून धडक दिली.

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले मनोहर मेस्त्री गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी मनोहर मेस्त्री यांना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर मेस्त्री यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे

Total Visitor Counter

3376278
Share This Article