GRAMIN SEARCH BANNER

एकात्मिक नागरी सेवा केंद्राच्या प्रस्तावाला राजापूर पालिका प्रशासनाकडून नकारघंटा

Gramin Varta
3 Views

राजापूर: शहरातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी नगरसेवक महेश शिवलकर यांनी नगर परिषदेच्या पुढाकारातून नगराध्यक्षा अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांच्याकडे मध्यवर्ती एकात्मिक नागरी सेवा सुविधा केंद्राच्या विचारार्थ सादर केलेल्या लेखी प्रस्तावाबाबत नगर परिषद प्रशासनाने नकारघंटा वाजवली आहे.

जागा आणि निधीच्या अभावाचे कारण देत परिषद प्रशासनाने हा प्रकल्प शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हा विषय २५ मे रोजी होणाऱ्या पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. यावर सदस्यांच्या भावना आणि मते पुढे येणार आहेत.

नगरपरिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार असे केंद्र उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता आहे. मात्र शहरविकास आराखड्यात पालिकेच्या मालकीची तशी मोकळी जागा उपलब्ध नाही. मोठे संकुल उभारावे लागणार असल्याने प्रथमदर्शनी जागेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. शिवाय या प्रकल्पासाठी मोठ्या स्वरूपात निधी लागणार आहे. भौतिक स्वरूपातील या सेवेची जबाबदारी घेणे पालिकेला सध्या उचित वाटत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता नागरी सेवा सुविधा केंद्र उभारणे शक्य होणार नाही.

वस्तुतः तशी स्थिती नाही. राजापूर पालिकेकडे असलेल्या जकात नाका परिसरातील विश्रामगृह आणि जुन्या ग्रामीण रुग्णालयाची जागा या दोन मोठ्या जागा पडून आहेत. राजापूर शहरात नागरिकांना दैनंदिन सुविधा उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शहरातील कुटुंबे नजीकच्या आणि मोठ्या शहरात स्थलांतरित होत आहेत. तरंगत्या लोकसंख्येमुळे दस्तुरखुद्द राजापूर पालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शहराची ग्रामपंचायत करावी ही मागणी आजही प्रलंबित आहे. सुविधांचा अभाव, अनेक शासकीय कर्मचारी सायंकाळी राजापुरात न राहता शहर सोडतात, याचे कारणदेखील सुविधांचा अभाव हेच आहे. पालिकेने केवळ अशा एकात्मिक केंद्राच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यावसायिकांना छोटे गाळे उपलब्ध करून द्यावेत वढीच मागणी असताना पालिका प्रशासनाच्या निर्णयाने नागरीकांना मोठा धक्का बसला आहे, असे मत प्रस्ताव सादर करणारे नगरसेवक महेश शिवलकर यांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

3399790
Share This Article