GRAMIN SEARCH BANNER

सावर्डेच्या आफिया चिकटेची महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी निवड!

Gramin Varta
133 Views

रत्नागिरी जिल्हा संघात स्थान, पुणे येथे होणार राज्यस्तरीय स्पर्धा

सावर्डे: रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची गुणवंत खेळाडू आफिया चिकटे हिची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील ही निवड असून, या निमित्ताने आफिया आता महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन (एम.सी.ए.) मार्फत पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नुकतीच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे १५ वर्षांखालील वयोगटातील मुलींची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीला जिल्ह्यातून असंख्य होतकरू खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सावर्डे येथील गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीची विद्यार्थिनी आफिया चिकटे हिने रत्नागिरी जिल्हा संघात आपले स्थान निश्चित केले.

आफिया चिकटे ही अत्यंत गुणवान, जिद्दी आणि होतकरू खेळाडू म्हणून ओळखली जाते. मागील तीन वर्षांपासून ती प्रशिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे कसून प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर तिने ही महत्त्वपूर्ण मजल मारली आहे. तसेच, आफिया ही सह्याद्री शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे.

आफियाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमी, सह्याद्री शिक्षण संस्था आणि संपूर्ण पालक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. तिच्या निवडीबद्दल अकॅडमीचे सर्वेसर्वा व विद्यमान आमदार शेखरजी निकम, अकॅडमीचे अध्यक्ष व युवा नेतृत्व अनिरुद्धजी निकम, सह्याद्री शिक्षण संस्था आणि सर्व पालक वर्ग यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव रोशन करावे यासाठी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आफियाच्या या निवडीमुळे सावर्डेतील उदयोन्मुख खेळाडूंना एक नवी प्रेरणा मिळाली आहे.

Total Visitor Counter

2647287
Share This Article