GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप उसळला!

Gramin Varta
260 Views

खड्डेमय रस्ता झाला जीवघेणा; निष्काळजी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया

धामणी/ सचिन यादव: कोकणचा जीवनदायिनी मानला जाणारा मुंबई-गोवा महामार्ग आता नागरिकांसाठी भयाचा मार्ग ठरू लागला आहे. पावसाळा संपला तरी या रस्त्याचे दुर्दशेचे चक्र कायम असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष दिसून येते. परिणामी प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१८ वर्षांपासून सुरू असलेले महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाही. उलट नव्याने बनवलेल्या रस्त्यांवरच ठिकठिकाणी तडे गेले आहेत, तर काही भागांत मोठे खड्डे तयार झाले आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी खड्डे भरून आणि मलमपट्टी करून कोट्यवधी रुपयांची बिले फाडली जातात, पण प्रत्यक्षात रस्ता जसाच्या तसा खड्डेमयच राहतो. या खर्चाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोकणातील मंत्री, खासदार, आमदार सगळेच या रस्त्यावरून प्रवास करतात, मग त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का? ठेकेदारांचे हितच जपले जात आहे का? हा प्रश्न आता जनतेच्या मनातील रोषाचे प्रतीक ठरला आहे.


या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांना कंबरदुखी, पाठीचे दुखणे, स्पाँडिलायटीस असे आजार जडत आहेत. वाहनातून प्रवास करताना बसणारे जबरदस्त हादरे हे शरीरासाठी त्रासदायक ठरत आहेत. अनेकांना घरी परतल्यावर बाम, आयोडेक्स लावून विश्रांती घ्यावी लागते, तर काहींना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते.

आता हा नसता त्रास संपायलाच हवा! जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू! असे संतप्त शब्द उच्चारत अनिल जाधव आणि इतर नागरिकांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे हे खड्डेमय वास्तव आता कोकणातील नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत करत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर रस्त्याबरोबरच जनता देखील ‘पेटून’ उठेल, हे नक्की!

Total Visitor Counter

3370003
Share This Article