GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने परतताना फोन आला डॉक्टर सर्पदंश रुग्ण गंभीर आहे… अन् डॉ. राम मेस्त्री देवदूत बनून धावले….

Gramin Varta
1.1k Views

सुमारे 3000 सर्पदंश रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार

तुषार पाचलकर / राजापूर

राजापूर आणि कोकणातील ग्रामीण आरोग्यसेवेला नेहमीच खंबीरपणे उभं राहणारे डॉ. राम मेस्त्री यांनी पुन्हा एकदा तातडीची परिस्थिती हाताळून एका गंभीर रुग्णाचा जीव वाचवला. ही घटना सोमवारी रात्री घडली.

कोल्हापूर येथे विभागीय स्तरावरील कार्यशाळा आटोपून राजापूरकडे परतणाऱ्या डॉ. मेस्त्री यांना अर्ध्या वाटेतच ऑन-ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोन आला  फुरसा सर्पदंशाची महिला रुग्ण दाखल झाली आहे. नवख्या डॉक्टरांना मार्गदर्शन करून ते पुढील प्रवासाला लागले. काही मिनिटांतच पुन्हा फोन आला आणखी एक रुग्ण दाखल झाला आहे. या वेळी परिस्थिती आणखी गंभीर आहे. रुग्ण पूर्णपणे मद्यप्राशन केलेला, नातेवाईक नसलेला, BP dangerously low अशा स्थितीत आहे.

अणुस्कुरा घाट उतरतानाच उपचारांची दिशा देण्यात आणि नवख्या अधिकाऱ्यांना स्लो मेथडने ASV सुरू करण्याचं निर्देश डॉक्टरांनी दिले. तिसऱ्या फोनने परिस्थिती चिंताजनक झाली हिरड्यातून रक्तस्राव येतोय. थोड्याच्या वेळात रक्ताची उलटी झाली.

या क्षणी डॉ. मेस्त्री यांनी गती वाढवली आणि रात्री सव्वा दहाला ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे पोहोचले. डॉक्टरांसमोरच सलग रक्ताच्या उलट्या, BP कोसळलेले… परिस्थिती अत्यंत गंभीर डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता उपचाराला सुरुवात केली.

अशा प्रसंगी साधारण उपचार पुरेसे नसतात. मागील 25 वर्षांच्या सर्पदंश उपचाराच्या अनुभवाच्या बळावर डॉ. मेस्त्री यांनी पुढील एका तासात 40 Inj. ASV देण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला इंजेक्शनची रिअॅक्शन होत होती, परंतु उपचार थांबवणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे होते.

नातेवाईकही तेव्हाच पोहोचले. उपचार सुरूच ठेवत अखेर रक्तस्राव थांबला, उलट्या कमी झाल्या आणि रुग्णाचे व्हायटल्स स्थिर होऊ लागले. परिस्थिती नियंत्रणात आणून, ऑन-ड्युटी टीमला पुढील मॉनिटरिंगच्या सुचना देऊन डॉ. मेस्त्री रात्री उशिरा घरी परतले. सकाळी आलेला फोन मात्र सुखावह  “रुग्ण आता पूर्णपणे स्टेबल आहे.”

डॉ. मेस्त्री यांनी मागील पंचवीस वर्षात सुमारे 3000 च्या वर सर्पदंश रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. त्यांच्या या तत्परतेने अनेकांचे प्राण वाचत आहेत. अनेकांच्या दुवा त्यांच्या पाठीशी आहे.

Total Visitor Counter

3102566
Share This Article