GRAMIN SEARCH BANNER

गुंगीचे औषध देऊन स्टाफ नर्सचा विनयभंग

Gramin Varta
3 Views

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३८ वर्षीय स्टाफ नर्सला गुंगीचे औषध देऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ६ मे रोजी रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वार्ड क्रमांक ४ मध्ये नाईट ड्युटीवर कार्यरत होत्या. त्यावेळी गौरव शिरसाट नावाचा वॉर्ड बॉयही ड्युटीवर होता. रात्री साडेआठच्या सुमारास महिलेची प्रकृती अचानक बिघडली व त्यांचा रक्तदाब कमी झाला. त्यामुळे त्या उपचारासाठी अपघात विभागात गेल्या. डॉक्टरांनी त्यांना सलाईन आणि इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र ड्युटी सुरू असल्याने त्यांनी वार्डमध्येच उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर त्या पुन्हा वार्ड क्रमांक ४ मध्ये परतल्या. त्यावेळी त्यांच्या पाण्याची बाटली वॉर्ड बॉयकडे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी त्या बाटलीतील पाणी प्यायले असता पाणी कडू लागत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. प्रकृती अधिक खालावल्याने त्या वार्ड क्रमांक ३ मध्ये गेल्या. तेथे त्यांना नव्याने सलाईन व इंजेक्शन देण्यात आले. रात्री सुमारे ११.१५ वाजता सलाईन लावल्यानंतर त्यांना काहीही आठवत नसून आपण झोपेत गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सकाळी साडेसातच्या सुमारास जाग आल्यानंतर आपले अंतर्वस्त्र काढलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपला विनयभंग झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात पीडितेला गुंगी येईल असे काही पदार्थ सलाईन किंवा पाण्यातून देण्यात आले का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी महिलेचा रक्तनमुना न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3371098
Share This Article