GRAMIN SEARCH BANNER

वाशिष्ठी व कृषी प्रदर्शनातून कोकणातील शेतीला नवी दिशा

Gramin Varta
59 Views

दुग्ध व्यवसायातून हजारो शेतकरी सक्षम- प्रशांत यादव

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील माणूस काही करू शकत नाही, हा गैरसमज कृषी प्रदर्शनामुळे दूर होत आहे. पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हतेमुळे हजारो शेतकरी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. काही शेतकरी महिन्याला दोन ते अडीच हजारापासून ते साडेतीन-चार लाख रूपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत. शासन, लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, जेणेकरून कोकणातील शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण युवकांना शाश्वत रोजगार मिळेल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी कृषी महोत्सवाच्या उद‌्घाटनप्रसंगी प्रास्ताविकावेळी व्यक्त केला.

कोकणातील शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन– कृषी महोत्सव २०२६ चिपळूणमध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाला असून या महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांसाठी नवी आशा आणि नवी दिशा निर्माण झाली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११.३० वाजता पार पडले.

यावेळी प्रास्ताविक करताना वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीचा प्रवास, दुग्धव्यवसायाची उभारणी आणि या माध्यमातून शेतकरी कसा सक्षम झाला याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रशांत यादव म्हणाले की, “हा कृषी महोत्सव चिपळूणमध्ये सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे होत असून, आमचे मार्गदर्शक नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांच्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी काम करताना आम्हाला एक ठोस दिशा मिळाली आहे. कोकणाचा चेहरा बदलण्याचे काम दादांनी केले असून, शेती व शेतीपूरक उद्योग उभे करण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.” वाशिष्ठी डेअरीची संकल्पना २०२१ साली चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली. सहकार क्षेत्रात काम करताना केवळ कर्जपुरवठा न करता, शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता वाढवणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे, या उद्देशाने वाशिष्ठी डेअरीची संकल्पना पुढे आली, असे यादव यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोकणातील भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक व्यवसाय आणि उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेऊन दुग्धव्यवसाय हाच शाश्वत पर्याय असल्याचे लक्षात आल्यानंतर वाशिष्ठी डेअरीची स्थापना करण्यात आली. १९६७ साली सुरू झालेली चिपळूण डेअरी २००० साली बंद पडल्याने जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर नव्या दमाने दुग्धव्यवसाय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१ मध्ये वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची सुरुवात झाली. अवघ्या एका वर्षात प्रकल्प पूर्ण करून २०२२ मध्ये दूध उत्पादन सुरू झाले.

सुरुवातीला केवळ ४०० लिटर दूध आणि ६० शेतकरी या प्रकल्पाशी जोडलेले होते. मात्र एका वर्षातच दूध संकलन  १७,५०० लिटर झाले आणि २,००० शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले. दुसऱ्या वर्षी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक व्यापक झाला. परिणामी दूध संकलन २५ हजार लिटरपर्यंत पोहोचले आणि ७ ते ८ हजार शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले. आज, तीन वर्षांच्या कालावधीत वाशिष्ठी डेअरीकडून दररोज सुमारे ५५ हजार लिटर दूध संकलन केले जाते आणि १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दहा दिवसांनी थेट पैसे जमा केले जातात. या कृषी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली असून, येत्या पाच दिवसांत ७ ते ८ लाख नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

मागील वर्षी साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. प्रदर्शनस्थळी १५ ते २० गुंठ्यांवर प्रत्यक्ष ‘लाईव्ह डेमो शेती’ उभारण्यात आली आहे. चार जनावरांच्या दुग्धव्यवसायासोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला व फळबाग लागवड केल्यास शेतकऱ्याला दरमहा ३० ते ३५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न कसे मिळू शकते, याचे प्रात्यक्षिक येथे दाखवण्यात येत आहे. तसेच काजू व फळपिक योजनांच्या माध्यमातून १२२ शेतकऱ्यांना शासन व बँक यंत्रणेशी जोडण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून किमान १०० ते २०० शेतकरी स्वयंपूर्ण व्हावेत, हा आमचा उद्देश असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चिपळूण नागरी पतसंस्था, वाशिष्ठी डेअरीची संपूर्ण टीम, स्थानिक ग्रामस्थ तसेच व्यवस्थापनात रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या स्वप्ना यादव व सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

यावेळी व्यासपीठावर खा. नारायण राणे,  सौ. निलम राणे, चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, महाराष्ट्र राज्य सह. दुध महासंघ मर्या. (महानंद)चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अनिरूद्ध निकम, चिपळूण नागरीच्या संचालिका ॲड. नयना पवार, तसेच शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक शशिकांत मोदी, अंकुश आवले, उदय जुवळे, संदीप भिसे, प्रमोद बुरटे, कपिल शिर्के, शुभम पिसे, गणेश आग्रे, रूपाली दांडेकर, अंजली कदम, रसिका देवळेकर, निहार कोवळे, हर्षाली पवार, वैशाली निमकर, पल्लवी महाडिक, निलम जाधव आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3089736
Share This Article