रत्नागिरी: सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी विभागाच्या वर्धापनदिनी रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे उद्योजक दीपक गद्रे यांना रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी उद्योजकांनी व्यवसायामध्ये मोठे व्हावे आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा या उद्देशाने ब्रिज इंजिनियर माधवराव भिडे यांनी स्थापन केलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी विभागाचा सातवा वर्धापन दिन येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री. गद्रे यांनी कंपनीच्या पायाभरणीमध्ये ज्यांनी हातभार लावला त्या साथीदारांनासुद्धा सोबत आणले होते. त्यांचादेखील तेथे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला निर्माण ग्रुपचे संस्थापक आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त अजित मराठे, बॉक्सर कन्स्ट्रक्शन संस्थापक) आणि सॅटर्डे क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे उपस्थित होते. व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग कसे करावे आणि विक्री कशी वाढवावी यावर प्रोम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक तुषार जोशी यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन केले. यावेळी श्री. गद्रे यांची मुलाखत अजित मराठे यांनी घेतली. श्री. गद्रे यांनी त्यांच्या आयुष्यातील व्यावसायिक प्रवास आणि त्यादरम्याने गद्रे मरीन एक्स्पोर्ट या कंपनीची पायाभरणीपासून ते जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे सुरीमी एक्स्पोर्टपर्यंतच्या प्रवासाचे अनेक पैलू सांगितले.
कार्यक्रमाचे प्रायोजकत्व अनबॉक्स युअर डिझायर संस्थापक गौरंग आगाशे, आधुनिक सलूनच्या संस्थापक सौ. आसावरी मंदार पवार, साई स्वरूप वास्तू संस्थापक प्रशांत जोशी यांनी स्वीकारले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. माधुरी कळंबटे, कु. संजना शेट्ये, सौ. ऋचा पानवलकर – थेटे यांनी केले. यावेळी रत्नागिरीसह मुंबई, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, चिपळूण येथून अनेक सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारे व्यवसायवृद्धीकरिता सॅटर्डे क्लबमध्ये सहभागी होणे किती जरुरी आहे आणि व्यावसायिक प्रवास करताना आपली कोणती कर्तव्ये आहेत, याचे मार्गदर्शन अजित मराठे यांनी केले. तसेच माधवराव भिडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
रिजन हेड तुषार आग्रे, डेप्युटी रिजन हेड राजेश शेट्ये आणि प्रतीक कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला. रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष प्रकाश भुरवणे (श्री स्वामी समर्थ टायर्स), सेक्रेटरी अमोल पाटणे (रुचीसंगम), ट्रेझरर ऋषिकेश रसाळ (आरएमआर ट्रेडर्स) आणि विभागाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरी: दीपक गद्रे यांना रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार प्रदान
