मुंबई/ उदय दणदणे: कलगी तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई (महाराष्ट्र राज्य) आयोजित आणि विभग फाउंडेशनचे संस्थापक सुशांत गणेश जाबरे यांच्या विशेष सहकार्याने मुंबई उपनगर येथे गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा-२०२५, कलगी तुरा दिनदर्शिका-२०२६ प्रकाशन तसेच शाहीर गुणगौरव आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, दहिसर चेक नाका, महाजन वाडी, मीरारोड (पूर्व) येथे सुरेश ऐनारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्यदिव्य सोहळा पार पडला.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून उद्योजक तथा मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, विभग फाउंडेशनचे राहुल शिंदे, समाज सेवक कैलास धाडवे व ॲड. दिपांजली कैलास धाडवे, उद्योजक प्रमिल पत्याने, समाज सेवक दिनेश कुरतडकर, न. लो. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकर, राष्ट्रवादी रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲड. राकेश रविंद्र साळुंखे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सहसेक्रेटरी माधव कांबळे तसेच नारायण चापडे, पांडुरंग बाईत, रामचंद्र घाणेकर, अप्पा फडकले, कृष्णा जोगळे, विनोद फटकरे आणि विभग फाउंडेशन टीम आदी मान्यवर उपस्थित होते.
सरचिटणीस संतोष गोविंद धारशे आणि सहसचिव सुधाकर शंकर मास्कर यांच्या रंगतदार निवेदनाने दिवसभर रंगलेल्या या सोहळ्यात मुख्य आकर्षण ठरलेल्या गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धेत एकूण ८ नृत्य संच सहभागी झाले होते. यातून धाकुनाथ नृत्य कला पथक- मु.पो.भातगाव तिसंग (वेलेवाडी ), गुहागर (रत्नागिरी) या संचाने प्रथम क्रमांक पटकावला, तर शिवशक्ती नाच मंडळ (मांडवकरवाडी) मु. पो. कातवली, खेड (रत्नागिरी) द्वितीय आणि श्री जुगाई देवी नृत्य कालापथक, मु.पो.काजूर्ली, ता.गुहागर (रत्नागिरी) तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या संचांना अनुक्रमे ११,०००/-, ७,०००/- आणि ५,०००/- रुपयांची रोख पारितोषिके, आकर्षक स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व ढोलकी देऊन गौरविण्यात आले. तसेच, उत्कृष्ट गायक म्हणून सुभाष बावदाने यांना ‘कराओके माईक’ आणि उत्कृष्ट वादक नितेश वसंत लोखंडे यांना ढोलकी देऊन आकर्षक स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींनी सांभाळली. सरपंच म्हणून सुरेश ऐनारकर आणि संतोष गोविंद धारशे यांनी काम पाहिले. कविता विभागासाठी डॉ. सूर्यकांत दत्ताराम चव्हाण, अनंत तांबे, सुरेश कदम, तर नृत्य विभागासाठी चंद्रकांत गोताड, झराजी वीर, चंद्रकांत धोपट यांनी परीक्षण केले. रंगबाजीचे परीक्षण (विभाग-१) सुरेश चिबडे, अशोक पाटील, सुरेश गंगाराम वीर आणि (विभाग-२) दिलीप शंकर नामे, प्रकाश पाजणे, तुषार पंदेरे या मान्यवरांनी केले.
या भव्य सोहळ्यात कलगी तुरा लोककला संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व युवा शाहीर कलाकारांचा गौरव करण्यात आला. कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५-२६ ने संजय रत्नाकर गोणबरे, आनंद भिकाजी कुळये, हिरु रामचंद्र भोस्तेकर, योगेश महादेव कातकर, प्रकाश सुलोचना रामजी पाजणे, अनंत सुरेश बावकर, शरद गणपत कदम, शाहिद आदम खेरटकर, अंकुश रामचंद्र गुरव, जयंत राजाराम चव्हाण, शांताराम विठ्ठल मालप या ११ शाहिरांना गौरविण्यात आले.
याचबरोबर, सामाजिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींनाही कलगी तुरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रभाकर हरिश्चंद्र धनावडे यांना कलगी तुरा उपासक पुरस्कार, विनोद कैलास गोरे (मुख्य संपादक, दैनिक अक्षराज मीडिया) आणि मुझम्मील मुश्ताक काझी (संपादक, ग्रामीण वार्ता) यांना कलगी तुरा आदर्श संपादक पुरस्कार, रघुनाथ भागवत (दै. पुढारी) यांना कलगी तुरा आदर्श पत्रकार पुरस्कार, जय गणेश मित्र मंडळ (दिलीप नामे आणि सहकारी) यांना कलगी तुरा आदर्श आयोजक पुरस्कार, तर अनंत धोंडू बाईत (अरविंद रेकॉर्डिग स्टुडिओ) यांना कलगी तुरा स्वरध्वनी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, संस्थेच्या वाटचालीस हातभार लावणारे सहसचिव सुधाकर मास्कर आणि माजी सदस्य चंद्रकांत धोपट यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ऐनारकर, उपाध्यक्ष सुरेश चिबडे, सरचिटणीस संतोष धारशे, सहसचिव सुधाकर शंकर मास्कर, सहसचिव दिलीप शंकर नामे, खजिनदार सुरेश कदम, माजी खजिनदार सत्यवान यादव, सदस्य दामोदर गोरीवले, अनंत मुंगळे, दीपक म्हादे, निलेश जोगळे, संतोष पारदले, विश्वनाथ रक्ते, सचिन धुमक, प्रचार प्रमुख उदय दणदणे आणि माजी सदस्य चंद्रकांत धोपट आदी पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
विभग फाउंडेशनचे संस्थापक सुशांत गणेश जाबरे यांच्या सौजन्याने सोहळ्याला उपस्थित सर्व कलावंत आणि मान्यवरांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संतोष गोविंद धारशे यांनी केले आणि त्यांनीच उपस्थित प्रमुख अतिथी, मान्यवर व कलाप्रेमींचे आभार मानून सोहळ्याची सांगता केली.





