GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : फुणगुसमध्ये अवघ्या 4 तासांत दोन भीषण अपघात

Gramin Varta
835 Views

संगमेश्वर : फुणगुस परिसर पुन्हा एकदा अपघातांनी हादरला आहे. एकाच दिवशी काही तासांच्या अंतरात दोन जड वाहनांचे भीषण अपघात घडल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. संगमेश्वरकडे खडी घेऊन जाणाऱ्या डंपरचा शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फुणगुस येथे भीषण अपघात झाला. या अपघाताच्या धक्क्यातून परिसर सावरतो न सावरतो तोच याच मार्गावर रात्री साडेदहाच्या सुमारास गोव्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या प्लास्टिक मालाने भरलेल्या आयशर वाहनाचा आणखी एक भीषण अपघात झाला.

या दोन्ही अपघातांत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही क्षणांसाठी चालक व सहचालकांच्या नजरेसमोर मृत्यू उभा ठाकल्याचे चित्र होते. दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने आयशर वाहनाचा तोल सुटून ते रस्त्यावरच पलटी झाले. वाहन थेट दरीकडे झुकल्याने क्षणभर थरार निर्माण झाला. सुदैवाने वाहन दरीत कोसळले नाही, अन्यथा मोठी जीवितहानी अटळ होती.

दुसऱ्या घटनेत अवघड व तीव्र वळणावर समोरील रस्ता न दिसल्याने डंपर थेट डोंगराला आदळला. जोरदार धडकेत डंपरचे अक्षरशः चुराडे झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

या अपघातानंतरही मानवतेचे दर्शन घडले. येथील ग्रामस्थ किरण भोसले यांनी अपघातग्रस्तांना रात्री एक वाजेपर्यंत मोलाची मदत केली. अपघातग्रस्तांच्या राहण्यापासून जेवणापर्यंत सर्व व्यवस्था त्यांनी स्वतः पाहिली. अपघात घडला की मदतीसाठी धावून जाणारे किरण भोसले परिसरात ‘देवदूत’ म्हणून ओळखले जात आहेत.
एकाच दिवशी झालेले हे दोन भीषण अपघात फुणगुस मार्ग किती धोकादायक बनला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित करतात. दाट धुके, अरुंद रस्ता, अवघड वळणे आणि भरधाव वाहने यामुळे हा मार्ग अपघातांचा सापळा ठरत असून प्रवाशांच्या मनात भीतीचे सावट गडद झाले आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3370670
Share This Article