GRAMIN SEARCH BANNER

लांजा येथे दुचाकीची टँकरला धडक; सांगलीतील तरुणाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
465 Views

लांजा:तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर विलवडे रेल्वे स्थानकानजीक आज सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव तेजस नरेंद्र देशपांडे (वय २३, राहणार हुपरी, सांगली) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टँकर चालक चांद बागवान (राहणार सोलापूर) हे आपला टँकर (एमएच ४६ सीएल ७५३६) घेऊन आंबा घाटमार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होते. टँकर विलवडे रेल्वे स्टेशनपासून साधारण २०० मीटर अंतरावर आला असता, समोरून येणाऱ्या ‘स्प्लेंडर प्रो’ (एमएच १० सीडी ९६०२) या दुचाकीने रस्ता परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि वेग जास्त असल्याने टँकरला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार तेजस देशपांडे गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

याप्रकरणी टँकर चालक चांद बागवान यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी मयत दुचाकीस्वार तेजस देशपांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3389537
Share This Article