रत्नागिरी: मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्येच शक्य असणारी एक गुंतागुंतीची आणि अत्यंत खर्चिक अशी ‘आर्थ्रोस्कोपिक एसीएल रिकंन्स्ट्रक्शन’ (Arhtroscopic ACL Reconstruction) ही दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. यामुळे सामान्य आणि गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, रत्नागिरीच्या वैद्यकीय सेवेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
नांदिवडे, जयगड, रत्नागिरी येथील रहिवासी असलेले श्री. रोहित रमाकांत मेने (वय ३० वर्षे) यांना गेल्या दीड वर्षापासून उजव्या पायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने ग्रासले होते. त्यांच्या गुडघ्याची ‘शिर’ (ACL) आणि ‘गादी’ (Meniscus) तुटल्यामुळे त्यांना चालताना तोल जाऊन लंगडत चालावे लागत होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, गुडघा अडकल्याने तो सरळ करणेही त्यांना शक्य नव्हते. खाजगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करणे अत्यंत खर्चिक असल्याने मेने यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला.
येथे अस्थिरोग विभागात दाखल झाल्यानंतर अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी त्यांच्या तपासण्या केल्या आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. निखिल देवकर यांनी त्यांच्या टीमच्या सहकार्याने रोहित मेने यांच्या उजव्या गुडघ्यावर गुंतागुंतीची ‘आर्थ्रोस्कोपिक एसीएल रिकंन्स्ट्रक्शन’ ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रोहित मेने यांचा अडकलेला गुडघा आता पूर्णपणे पूर्ववत झाला असून, ते आता तोल न जाता चालू शकणार आहेत.
गुंतागुंतीची आणि अवघड असलेली ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात यशस्वी झाल्यामुळे रत्नागिरीतील वैद्यकीय सुविधांचा दर्जा किती उंचावला आहे, हे सिद्ध झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुतार, शस्त्रक्रिया यशस्वी करणारे अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर, भूलतज्ञ डॉ. मंगला चव्हाण तसेच संपूर्ण कर्मचारी वर्ग यांचे रोहित मेने आणि त्यांच्या कुटुंबाने मनःपूर्वक आभार मानले असून, शासकीय रुग्णालयात मिळालेल्या उत्कृष्ट आणि वेळेवरच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ही शस्त्रक्रिया रत्नागिरीच्या गोरगरीब लोकांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मोठे वरदान ठरली आहे.