रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तरवळ माचिवलेवाडी येथे एका ७० वर्षीय वृद्धाने दीर्घकाळापासून असलेल्या मेंदूच्या आजाराला कंटाळून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी घडली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ, माचिवलेवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शिवाजी माचिवले यांना गेल्या सुमारे २८ वर्षांपासून मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याचा दुर्धर आजार जडला होता. या आजारावर रत्नागिरी येथील डॉ. पेवेकर यांच्यासह मुंबई येथेही त्यांचे दीर्घकाळ उपचार सुरू होते. मात्र, या जुनाट आणि गंभीर आजारामुळे आलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला ते कंटाळले होते.
दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यानच्या वेळेत त्यांनी आपल्या राहत्या घरातील छपरातील लाकडी वाशाला नायलॉनची दोरी बांधली. त्याच दोरीचा फास आपल्या गळ्याभोवती आवळून त्यांनी गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून १२ मिनिटांनी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद अमृत. क्रमांक ८०/२०२५, भारतीय न्याय संहिता (B.N.S.S.) च्या कलम १९४ प्रमाणे घेतली असून पुढील तपास सुरू आहे. एका जुनाट आजारामुळे एका ज्येष्ठाने टोकाचे पाऊल उचलल्याने माचिवलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.