इक्बाल पटेल / संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराचे कुलूप तोडून पाण्याचे पंप चोरणाऱ्या दोघा आरोपींना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. मयुर संजय मांजरेकर (वय २५) आणि मयुर अनंत कांबळे (वय ३०) अशी संशयितांची नावे आहेत.
या चोरीची फिर्याद शांताराम जयराम पाटोळे (वय ८०, रा. तळे, चटकवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी; सध्या विरार पूर्व, जि. पालघर) यांनी दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, यांच्या तळेकांटे येथील आंब्याच्या बागेतील घराशेजारील गोडावूनचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी ६ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान तोडून तीन पाण्याचे पंप चोरले. या प्रकरणी त्यांनी २६ सप्टेंबरला संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तळेकांटे बौद्धवाडी येथील मयुर मांजरेकर आणि मयुर कांबळे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन पाण्याचे पंप आणि चोरीसाठी वापरलेले वाहन, एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या सूचनेनुसार सपोफौ गावीत, पोहेकॉ कोलगे, पोहेकॉ मनवल, पोहेकॉ बरगाले व पोकॉ खरपे यांनी केली.
तळेकांटे येथे आंब्याच्या बागेतील पंप चोरी प्रकरणातील दोघांना अटक, संगमेश्वर पोलिसांचं कौतुक
