खेड: ऐनवरे येथे डुबी नदीपात्रातून वाळूची चोरी ; अज्ञाताविरोधात खेड पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

खेड: तालुक्यातील मौजे ऐनवरे येथील डुबी नदीच्या पात्रातून शासकीय परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करून तिची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा वाळू साठा नदीपात्रात लपवून ठेवण्यात आला होता.
या संदर्भात खोपी सजाचे तलाठी (अतिरिक्त पदभार कुळवंडी) संदीप शांताराम आहेर (वय ४७, रा. पूनम अपार्टमेंट, वेरळ, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तहसीलदार कार्यालय खेड यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार, १७ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या पूर्वी ऐनवरे येथील डुबी नदीपात्रात तपासणी केली असता, तिथे अज्ञात इसमाने अनधिकृतपणे उत्खनन करून साठवून ठेवलेली सुमारे ६,००० रुपये किमतीची २ ब्रास बारीक वाळू आढळून आली होती.

या शासकीय मालमत्तेच्या चोरीप्रकरणी खेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) [पूर्वीचे भारतीय दंड संहितेचे कलम ३७९] आणि खाण व खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ चे कलम २१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस या बेकायदेशीर वाळू उपसा आणि चोरीप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *