चिपळूण: शहरातील मार्कंडी हायस्कूलसमोरील गुहागर-कराड युनायटेड मुख्य रस्त्यावर चिपळूण नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावरील कामाचा खड्डा जेसीबीच्या साहाय्याने चुकीच्या पद्धतीने बुजवून, सुरक्षेसाठी लावलेले बॅरीगेट्स आणि सूचना फलक बाजूला सारून नागरिकांच्या जिवाशी खेळल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सहायक रविकांत सूर्यकांत सातपुते (वय ४५, रा. खंड बाजारपेठ, चिपळूण) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन शेट्ये (वय ४०, रा. वाणीआळी, चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ५ जून २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सचिन शेट्ये याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत, रस्त्याने जाणाऱ्या एका जेसीबीच्या (क्रमांक MH-13/DE-0335) चालकाला (प्रवीण शांतीलाल जाधव, रा. पेठमाप, चिपळूण) थांबवले. नगर परिषदेने पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातून काढलेली माती त्याने या जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खड्ड्यात भरण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर, नगर परिषदेने सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेले बॅरीगेट्स आणि ‘पाणीपुरवठा योजनेचे काम चालू असून पर्यायी मार्गाचा वापर करावा’ असा लावलेला सुचना फलकही बाजूला फेकून देऊन हा रस्ता वाहनांसाठी खुला केला.
खड्ड्यात टाकलेली माती ओली आणि चिखलमय असल्याने हा मुख्य रस्ता प्रचंड निसरडा झाला होता. त्यावरून वाहने गेल्याने खड्ड्यातील माती दबून मोठी दुर्घटना घडण्याची, वाहने घसरून पादचारी व वाहनधारकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. या बेजबाबदार कृतीमुळे नगर परिषदेच्या सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून पुढील कामही बंद पडले. या गंभीर प्रकारानंतर चिपळूण पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२५ आणि २२१ [पूर्वीचे भा.द.वि. कलम ३३६ व १८६] अन्वये आरोपी सचिन शेट्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






