GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये कंपनीतील कामगाराचा आकस्मिक मृत्यू

खेड : तालुक्यातील लोटे येथील कोजन प्लांटमध्ये शुक्रवारी (२१ जून २०२५) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तरुणाचा लोखंडी मालावरून पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पिंटू बबन सिंह (वय ४३, रा. घरडा केमिकल कंपनीमागे, लोटे, ता. खेड, मूळ रा. भोजपूर, बिहार) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटे येथील कोजन प्लांटमध्ये अश्विनी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज कंपनीचा (एमएच १२/एलटी/९०९६) क्रमांकाचा मालवाहू ट्रक लोखंडी माल घेऊन थांबलेला होता. त्यावेळी, पिंटू बबन सिंह हे ट्रकमध्ये काय माल आहे हे पाहण्यासाठी वर चढले. मात्र, दुर्दैवाने ट्रकमधील लोखंडी सामानावरून त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले.

या अपघातात पिंटू सिंह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने प्रथम लवेल येथील आणि त्यानंतर कळंबणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेने खेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेड पोलीस ठाण्यात २१ जून २०२५ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2474707
Share This Article