तुषार पाचलकर/राजापूर : तालुक्यातील जिजामाता विद्या मंदिर, रायपाटण प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक दामोदर परशुराम लिंगायत हे ३० जून २०२५ रोजी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त विद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
जून १९९२ मध्ये जिजामाता विद्या मंदिर, रायपाटण येथे रुजू झालेले लिंगायत सर, त्यापूर्वी काही वर्षे पालशेत हायस्कूल, गुहागर येथे इंग्रजी व भूगोल विषयांचे अध्यापन करत होते. रायपाटण येथे कार्यरत असताना त्यांनी इंग्रजी, भूगोल या विषयांसोबतच एनसीसी आणि स्काऊट विषयांतही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनियर, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांत यश मिळवले आहे.
विद्यादानासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा होता. २००० साली त्यांनी गावातील ग्रामस्थांच्या मदतीने ‘वडचाई व्यायामशाळा’ सुरू केली. या व्यायामशाळेच्या माध्यमातून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, वृक्षारोपण तसेच लायन्स क्लब, रत्नागिरी यांच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याव्यतिरिक्त शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी युवकांना व्यायामाची प्रेरणा दिली.
राजापूर तालुका लिंगायत संघटना स्थापन करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी पाच वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. संघटनेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. तरुण वयात त्यांनी जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा, जलतरण आणि मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘वसंत बापट आदर्श शिक्षक पुरस्कार’ (शिक्षण क्रांती संघटना, रत्नागिरी) आणि सामाजिक कार्यासाठी ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ (कोकण वीरशैव मंडळ, मुंबई) प्रदान करण्यात आले आहेत. शासनाने पहिलीपासून इंग्रजी सुरू केल्यानंतर त्यांनी ‘स्मार्ट पीटी’ चे तज्ञ मार्गदर्शन केले. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावीच्या इंग्रजी विषयाचा निकाल १०० टक्के लावण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची गोडी निर्माण केली.
वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजावी याकरिता ते दरवर्षी ‘साधना’ दिवाळी अंकांचे वितरण करत. तसेच, पर्यावरणाची आवड असल्याने ते दरवर्षी जून महिन्यात स्वखर्चाने झाडे विकत घेऊन विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेत असत. जून २०२३ ते जून २०२५ या कालावधीत त्यांनी जिजामाता विद्या मंदिर, रायपाटणचे मुख्याध्यापकपद यशस्वीपणे सांभाळले.
सोमवार, ३० जून २०२५ रोजी झालेल्या सेवापूर्ती समारंभात मुख्याध्यापक कुंभार सर, श्री. गौतम पांगरीकर, श्रीमती पल्लवी सावंत, संदीप कोलते, सुरेश कांबळे या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लिंगायत सरांच्या विविध गुणांचा गौरव करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रायपाटण गावातील अनेक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायपाटण केंद्राच्या शिक्षण परिषदेतही शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. लिंगायत सरांच्या निवृत्तीमुळे जिजामाता विद्या मंदिर आणि रायपाटण परिसराने एक निष्ठावान शिक्षक आणि समर्पित समाजसेवक गमावला आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.