चिपळूण: तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य आणि सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. ग्रामदैवत श्री वाघजाई देवी, कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आणि माहेरवाशिणींची रक्षणकर्ती श्री काळकाई देवी यांच्या जागृत वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या उत्सवासाठी श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, ज्येष्ठ आर्किटेक्ट सतीश राव यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले आहे.
गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी ब्राह्मण, मानकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव साजरा होईल, तर दुपारी १२ वाजता परंपरेनुसार श्रीफळ वाढवून प्रसादाचे वाटप केले जाईल. जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली पालखी सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली असून, पुजारी देवींच्या प्रतिमा पालखीत विराजमान करतील. रात्रीच्या वेळी कामथे आणि चिंचघरी येथील पालख्यांचे वाजतगाजत आगमन होणार असून, तिन्ही पालख्यांच्या भेटीचा विलोभनीय सोहळा ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळीत पार पडणार आहे.
दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष नियोजन करण्यात आले असून, रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पालख्यांना निरोप दिल्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार असून, सर्व भाविक आणि चाकरमान्यांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.






