GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत आज आंबा-काजू बागायतदारांचा मेळावा

रत्नागिरी: बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी रत्नागिरीत आज, दि.१८ एप्रिल रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार तथा रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळ माने यांनी दिली. ही सभा १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाचणे रोड येथील बालाजी मंगल कार्यालयात होणार असल्याचे ते म्हणाले.

शासकीय विश्रामगृहात आज (१७ एप्रिल) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. श्री. माने म्हणाले, कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे बोगस व निकृष्ट खते, कीटकनाशके व औषधांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढलेले तापमान व कीड-रोगांचे प्रमाण वाढल्याने शेती व मच्छीमारी दोन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत आहेत. या सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेमध्ये बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी आणि रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3485294
Share This Article