‘घरी आपली वाट पाहत आहेत’; पोलिसांची भावनिक सूचना
वैभव पवार, गणपतीपुळे : कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सुंदर मानला जाणारा गणपतीपुळे समुद्रकिनारा सध्या अत्यंत धोकादायक स्वरूप धारण करत आहे. मागील दिवाळी पर्यटन हंगामापासून समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांच्या घटना चिंताजनकरीत्या वाढल्या असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटकांना स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी वेळेवर मदत करून बाहेर काढले असले तरी, एक जण अद्याप बेपत्ता आहे.
स्थानिक जाणकार व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी पाऊस, समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि वादळसदृश परिस्थितीमुळे गणपतीपुळे समुद्राचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. भरती, ओहोटीमध्ये मोठे बदल होत असून सकाळच्या सुमारास भरतीचे पाणी थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत येते. त्यानंतर ओहोटीच्या वेळी समुद्र दूर सरकल्यावर मधल्या भागात नदीसारखा प्रवाह तयार होतो, ज्यातून पर्यटकांना कमरेभर पाण्यातून चालावे लागते.
यावर्षी समुद्रात चाळ आणि खोल खड्डे निर्माण झाले असून, समुद्रात स्नानासाठी उतरणाऱ्या व्यक्ती हे खड्डे न कळत पायात अडकतात आणि बाहेर येणे कठीण होते. त्यामुळे बुडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसंच अतिउत्साही आणि बेफिकीर पर्यटकही धोक्याला निमंत्रण देत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस व जयगड सागरी पोलीस यांच्या वतीने संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. “श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक आहे. दरवर्षी येथे बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खोल पाण्यात उतरू नका; आपला जीव आपल्या कुटुंबासाठी मोलाचा आहे. सावध रहा—घरी आपली वाट पाहणारे आहेत,” असा भावनिक संदेश पोलिसांनी दिला आहे.
सध्याच्या बदललेल्या समुद्री भूस्थिति लक्षात घेता, पर्यटकांनी अतिशय कमी पाण्यातच उतरणे, समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना अतिरिक्त साहस टाळणे आणि स्वतःची सुरक्षा प्राधान्याने पहाणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुरक्षिततेची काळजी घेतल्यासच सुंदर समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनानंद खऱ्या अर्थाने अनुभवता येईल, असेही मत व्यक्त केले जात आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनारी चाळ–खड्ड्यांमुळे बुडण्याच्या घटनांत वाढ, जाणकारांनी सांगितली कारणे






