GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या अथर्व पाटीलचा न्यूझीलंडमध्ये ‘उत्कृष्ट वैमानिक’ म्हणून सन्मान

Gramin Varta
62 Views

रत्नागिरी : रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरातील रहिवासी असलेल्या अथर्व अतुलराज पाटील या ध्येयवेड्या तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. अथर्वने न्यूझीलंड सरकारचा अत्यंत प्रतिष्ठित असा ‘उत्कृष्ट वैमानिक’ (Best Pilot) पुरस्कार पटकावून आपली गगनभरारी सिद्ध केली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे केवळ कोकणच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूझीलंडचे हवाई वाहतूक मंत्री जेम्स मिगर यांच्या हस्ते अथर्वला नुकतेच या पुरस्काराने गौरवण्यात आले असून, सध्या सोशल मीडियावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अथर्वचे बारावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील नामांकित गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाले. वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने न्यूझीलंडमध्ये तब्बल १९ महिन्यांचा खडतर वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. या कालावधीत घेतलेल्या अत्यंत कठोर चाचण्या आणि परीक्षांमध्ये अथर्वने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषतः ‘सीपीएल फ्लाईट टेस्ट’ (CPL Flight Test) मध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवत आपली उपजत क्षमता आणि तांत्रिक ज्ञान सिद्ध केले. यापूर्वीच त्याने भारतातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली होती. या सर्व यशाच्या पायऱ्या चढल्यानंतर आता अथर्वला भारतासह न्यूझीलंडमध्येही व्यावसायिक जेट आणि मोठी प्रवासी विमाने उडवण्याचा अधिकृत परवाना मिळाला आहे. कोकणातून थेट आंतरराष्ट्रीय विमानांच्या कॉकपिटपर्यंत पोहोचण्याचा त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरीकरांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3235355
Share This Article