राजापूर : राजापूर ते दसुर मार्ग हा तालुक्यातील एक महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता असून, भू, खिनगिणी, तेरवण, थोरलीवाडी, पेंडखले, वडदहसोळं, भालावली, देवीहसोळ, कोतापूर या गावांतील नागरिक आणि प्रवासी या मार्गाचा नियमित वापर करतात.
यावर्षी एअरटेल कंपनीने या रस्त्यालगत आपली ओएफसी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोल चर खोदण्याचे काम हाती घेतले होते. हे काम करताना कोणतीही दक्षता न घेतल्याने रस्त्यालगत अतिशय जवळ चर खणले गेले. या कामाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) तत्कालीन अधिकारी श्री. कांबळे यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या चरांमध्ये माती खचली असून, त्या मऊ भागावर वाहनांचे चाक गेले तरी ते रुतते किंवा वाहन बाजूला झुकते. गेल्या काही आठवड्यांपासून असे प्रकार सातत्याने घडत असून, आज राजापूरहून भवानी मंदिरकडे जाणारी एस.टी. बस अशाच रस्त्यालगतच्या नरम झालेल्या साईड पट्टीवरून घसरून झाडावर आदळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र अपघाताचे चित्र पाहून प्रवासी आणि ग्रामस्थ भयभीत झाले.
या घटनांमुळे पीडब्ल्यूडी व एअरटेल कंपनी यांच्यात संगनमत होऊनच हे काम झाले का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. आता तरी प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
राजापूर : एअरटेलच्या खोदकामाचा फटका, दसुर मार्गावर बसला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
