रत्नागिरी: शहरातील एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पायाच्या दुखण्यावर औषध घेतल्यानंतर दारू प्यायल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरकेश लल्लू सिंग (वय ३८, मूळ रा. मध्यप्रदेश) हा गेल्या महिन्याभरापासून रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथील वैशाली बारच्या बाजूला सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता.
त्याच्यासोबत सुखेंद्र कुमार रजत, रामा सिंग आणि नंदू सिंग हे देखील होते. हरकेशच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर फोड आल्याने त्याला त्रास होत होता. त्यामुळे एका मेडिकलमधून गोळी आणून त्याला देण्यात आली होती. गोळी घेतल्यानंतर त्याने दारू प्यायली आणि त्याला उलट्या झाल्या.
या घटनेनंतर त्याच्या पायाचे दुखणे अधिकच वाढले. त्यामुळे त्याला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवले. त्यानंतर हरकेश आपल्या राहत्या ठिकाणी आराम करण्यासाठी थांबला, तर त्याचे इतर सहकारी कामासाठी निघून गेले.
सायंकाळी त्रिलोक विशाल सिंग नावाचा त्यांचा सहकारी परत आल्यावर त्याने हरकेशला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केली असता हरकेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरीत परप्रांतीय बांधकाम कामगाराचा मृत्यू
