खेड: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत आज रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर बॅटरी आणि इन्व्हर्टरचे उत्साहात वाटप करण्यात आले. खेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी हा वितरण सोहळा पार पडला. शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने आमदार म्हात्रे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या उपकरणांची उपलब्धता करून दिली आहे.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र साळवी, भाजपा नगरसेवक तथा गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद नांदगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच संस्थेचे चेअरमन राजेश बुटाला, संभाजी देवकाते, विजय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार आणि ओवैस चौगुले यांसह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शाळांचा वीज प्रश्न सुटण्यास मदत होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळांना अखंडित वीजपुरवठा मिळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी खेड, दापोली आणि मंडणगड या तिन्ही तालुक्यातील शिक्षक, प्राचार्य तसेच शिक्षक मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या या शैक्षणिक पुढाकाराचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.






