संकल्प कलामंचच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यात ‘स्वामीराया’ गीताचे अनावरण, उद्योजक धर्मेंद्र सावंत यांच्या हस्ते
रत्नागिरी: स्वामींच्या भक्तीचा महिमा अगाध असून, याच भक्तिभावातून स्फुरलेले “स्वामीराया” हे एक नवीन गीत नुकतेच संकल्प कलामंचच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यामध्ये रत्नागिरीत अनावरण करण्यात आले. रत्नागिरीमधील प्रसिद्ध उद्योजक श्री. धर्मेंद्र सावंत यांच्या हस्ते या गीताचे अनावरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संकल्प कलामंच संस्थेचे अध्यक्ष श्री. विनयराज उपरकर, तसेच अण्णा वायंगणकर, गुळवणी सर, डॉक्टर दिलीप पाखरे, श्री. पाटील, डॉक्टर शेरे, डॉ. कल्पना मेहता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
“स्वामीराया” हे गीत रत्नागिरीमधील सुप्रसिद्ध गायक गुरुदेव नांदगावकर यांच्या आवाजात रसिकांना ऐकायला मिळणार आहे. या गीताची संकल्पना, गीत आणि संगीत श्री. वैभव पुरुषोत्तम नांदगावकर, आडिवरे यांची आहे. साईल शिवगण आणि नवलाई म्युझिक प्रोडक्शन, नाचणे, रत्नागिरी यांनी या गीताचे संगीत संयोजन आणि रेकॉर्डिंगची जबाबदारी सांभाळली आहे, तर अखिल माने यांनी या गीताचे संकलन केले आहे. व्हिडिओमध्ये श्री. विजय मायंगडे आणि गार्गी शेलार यांनी अभिनय केला आहे.
विशेष म्हणजे, हे व्हिडिओ स्वरूपातील गीत पूर्णतः रत्नागिरीमध्येच तयार करण्यात आले आहे. हे गीत “morya creation” या YouTube चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येईल. यू ट्यूबवर हे गीत आता रसिकांच्या पसंतीला उतरले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.