त्यांचा बोलविता धनी वेगळाच, चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामांना आपला कायम विरोध
राजापूर : भाजपाचे तालुकाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या मोहन घुमे यांनी शहराच्या विकासासाठी किती निधी आणला त्यावर बोलण्याऐवजी ते माझा राजकीय इतिहास सांगून आपली राजकीय अपरिपक्वता सिद्ध करत आहेत. चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यासाठीच घुमे यांना तालुकाध्यक्ष पद दिले आहे की काय असा प्रश्न आपल्यासह शहरवासीयांना पडला आहे. घुमे यांचा बोलाविता धनी कोण आहे ते आपणाला चांगलेच ज्ञात आहे, त्यामुळे यापुढे घुमे यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी दिली.
माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात सन 2018 ते 2021 मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी आपण शहरातील अनेक विकास कामे मार्गे लावली. एवढेच नव्हे तर राज्यात युतीची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आणून जनतेच्या लक्षात राहतील अशी अनेक विकास कामे केली आहेत. विरोधी पक्षात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून निधी आणण्याऐवढे आपले कर्तृत्व असावे लागते ते आमच्याकडे होते म्हणूनच भाजपा आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी निधी दिला. तुम्ही पक्षाशी निष्ठावान असल्याच्या बढाया मारता मग तुम्ही शहराच्या विकासासाठी किती निधी आणला ते जाहीर करावं, उगाच आपले अपयश झाकण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नका असा सल्ला आहे ॲड.खलिफे यांनी दिला आहे. विकासाला माझा कधीही विरोध नाही. म्हणूनच शहरातील मुख्य रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्नशील आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळे हे काम रेटवून देण्यात आले. आताही तसाच प्रयत्न सुरू आहे. शहरात अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने कामे करण्याचा नवा पायंडा पडत असून त्याला आपला ठाम विरोध असून तो यापुढेही कायम राहील.
घुमे यांचा बोलाविता धनी दुसराच असून तो कोण आहे हे मला चांगलेच ज्ञात आहे. शिवाय त्यांच्या आरोपाला उत्तर देण्याएवढे ते राजकारणात परिपक्व नाहीत. त्यामुळे यापुढे त्यांच्या कोणत्याही टिकेला आपल्याकडून उत्तर मिळणार नाही कसे असेही ॲड.खलिफे यांनी सांगितले.
राजकीय दृष्ट्या अपरिपक्व असलेल्या मोहन घुमे यांच्या टीकेला यापुढे उत्तर देणार नाही.. : ॲड.जमीर खलिफे
