GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत ‘उबाठा’ कार्यकर्त्याकडून सफाई कर्मचाऱ्याला मारहाण

कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, अखेर लेखी माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले!

रत्नागिरी: शहरातील राजीवडा परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली. रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई विभागाचे कर्मचारी मनोहर कदम यांना ‘उबाठा’ शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने कामबंद आंदोलन पुकारले, ज्यामुळे नगर परिषद प्रशासनातही मोठी धांदल उडाली. अखेर, ‘उबाठा’ पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर, मारहाण करणाऱ्या साजिद पावसकर यांच्या लेखी माफीनाम्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी राजीवडा परिसरात सफाई कर्मचारी मनोहर कदम यांना साजिद पावसकर यांनी फोन केला होता, परंतु कदम यांनी तो उचलला नाही. याच दरम्यान, कदम आणि पावसकर यांची राजीवडा येथे समोरासमोर भेट झाली. यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्याचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि पावसकर यांनी कदम यांना मारहाण केली.

या घटनेची माहिती रत्नागिरी नगर परिषद प्रशासनापर्यंत पोहोचताच सर्व सफाई कर्मचारी प्रचंड संतप्त झाले. शासकीय काम करत असताना कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यामुळे सफाई कर्मचारी संघटनेने एकजूट दाखवत तातडीने कामबंद आंदोलन पुकारले. नगर परिषद आवारात मोठ्या संख्येने एकत्र येत कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते साजिद पावसकर यांना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी करत होते.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून ‘उबाठा’चे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मध्यस्थी केली. साळुंखे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे या प्रकरणात गुन्हा दाखल न करता काहीतरी तोडगा काढण्याची विनंती केली. पावसकर हे यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये उपस्थित होते. अखेर, पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारण्याऐवजी साजिद पावसकर यांनी लेखी माफीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली. आपली चूक लक्षात येताच, पावसकर यांनी तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांसमोर प्रशासनाला मारहाण प्रकरणी लेखी माफीनामा सादर केला. त्यांच्या माफीनाम्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि पुन्हा कामावर रुजू झाले.

प्रशासनाची कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीर भूमिका
या संपूर्ण घटनेत नगर परिषद प्रशासन आणि अधिकारी सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मारहाण करणाऱ्या पावसकर यांना स्पष्ट शब्दात सुनावण्यात आले की, “या कर्मचाऱ्यांमुळे आपले शहर स्वच्छ आहे. ते कोणत्या परिस्थितीत काम करतात, हे सांगायची गरज नाही. सफाई कर्मचारी म्हणून त्यांना कोण वाली नाही, असे समजू नका. नोकरी गेली तर बेहत्तर, पण पुन्हा असा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला तर गाठ आमच्याशी राहील!” या इशाऱ्याने प्रशासनाची कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतची कटिबद्धता स्पष्ट झाली.

Total Visitor Counter

2475467
Share This Article