GRAMIN SEARCH BANNER

सियाल इंडिया 2025 मध्ये ‘उमेद’चा डंका

Gramin Varta
12 Views

देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूस आंब्याचे सादरीकरण

मुंबई: मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया 2025 या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या सियाल इंडियामधील सहभागामुळे त्यांची उत्पादने या व्यासपीठामार्फत थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहेत. ग्रामीण महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे.

या प्रदर्शनात १७ हून अधिक उत्पादने सादर करण्यात आली असून त्यामध्ये माढ्याचे डाळिंब, केळी, शेवगा; नाशिकचा लाल कांदा; धाराशिवच्या न्यूट्री शेवया; वायगावची GI हळद; देवगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा हापूस आंबा; साताराचे मिलेट कुकीज व घाण्यावरचे तेल; सोलापूरची मालदांडी ज्वारी; प्रसिद्ध इंद्रायणी व चिनूर तांदूळ; चारू तूरडाळ तसेच बाजरी, नाचणी व मिरचीसारखी उत्पादने विशेष आकर्षण ठरली.

जागतिक पातळीवरील मान्यता

एक्स्पोचे उद्घाटन सियालचे महासंचालक श्री. निकोलस ट्रेंट्रेसॉक्स व एपीडा (APEDA) चे अध्यक्ष श्री. अभिषेक देव यांच्या हस्ते झाले.

श्री.ट्रेंट्रेसॉक्स यांनी उमेदच्या विविध स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची गुणवत्ता तपासली व उमेदला गल्फ सियाल आणि दिल्ली सियालमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच अभिषेक देव यांनी उमेदची उत्पादने अपेडा (APEDA) पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर व मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी ग्रामीण महिलांच्या कष्टाचे कौतुक करत हे यश महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देईल असा विश्वास व्यक्त केला.

सियाल इंडिया 2025 मधील या यशामुळे ग्रामीण महिलांना जागतिक बाजारपेठेत प्रवेशाचे दार खुले झाले आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारामुळे ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या उत्पादनांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कायमस्वरूपी दालन उपलब्ध झाले आहे. त्यांची उत्पादने महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे यश महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरले आहे.

‘उमेद’ अभियानाच्या उत्पादनांची मोठी रेंज

या प्रदर्शनात ‘उमेद’ अभियानाने १७ प्रकारची उत्पादने सादर केली आहेत, जी वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार आहेत.

* माढा येथील डाळिंब, केळी, शेवगा

* नाशिकचा प्रसिद्ध लाल कांदा

* धाराशिवचे न्यूट्री शेवया

* वायगावची भौगोलिक निर्देशांक (GI) प्राप्त हळद

* देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा

* साताराचे मिलेट कुकीज

* सोलापूरची मालदांडी ज्वारी

* प्रसिद्ध इंद्रायणी आणि चिनूर तांदूळ

* चारू तूरडाळ

* साताराचे घाण्यावरचे तेल (कोल्ड प्रेस ऑइल)

* बाजरी, नाचणी आणि मिरची यांसारखी इतर अनेक उत्पादने आहेत.

Total Visitor Counter

2645823
Share This Article