चिपळूण: रायगड जिल्ह्यातील महाड येथे गुरुवारी सकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवून दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने सुसाट पळालेल्या दोन सराईत चोरट्यांना चिपळूण पोलिसांनी थरारक पाठलाग करून घेरले. कामथे येथील घनदाट जंगलात झालेल्या या कारवाईत एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
महाडमध्ये चोरी केल्यानंतर चोरटे वेगाने रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत शिरले. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कडेकोट नाकाबंदी केली होती. दरम्यान, हे चोरटे चिपळूणवरून सावर्डेच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी चोरट्यांनी दुचाकीची नंबर प्लेट बदलली आणि स्वतःचे कपडेही बदलले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा बनाव फसला. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी कामथे घाटात आपली दुचाकी सोडून थेट जंगलात धाव घेतली.
कामथे कदमवाडी आणि जावळेवाडी परिसरात हे संशयित चोरटे दिसताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी ग्रामस्थांनी दाखवलेल्या धैर्यामुळे एका चोरट्याला पकडून दोरीने बांधून ठेवण्यात आले, तर दुसऱ्या चोरट्याने पोलीस आणि ग्रामस्थांच्या दिशेने दगडफेक करत जंगलात पळ काढला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी कामथे, कदमवाडी आणि जावळेवाडी परिसरात आरसीपी पथकाच्या मदतीने वेढा घातला आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्याला चिपळूण पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, जंगलात लपलेल्या दुसऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस रात्रभर गस्त घालत आहेत.







