रत्नागिरी: कॅनिंगच्या आंब्याचा प्रतिकिलोचा दर वाढवून देण्याची मागणी आंबा बागायतदारांतर्फे माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की कोकणातील शेतकरी यावर्षी आंब्याच्या मोहोर गळतीने, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, कीटकनाशकावरील वाढता खर्च या सर्व घटकांमुळे मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे रत्नागिरीतील हापूस आंबा कॅनिंगसाठी कंपन्यांमध्ये जात असताना दरांमध्ये ५० टक्के कपात करून बागायतदारांची मोठी लूट केली जात आहे. हंगामाच्या ऐन भरात दर अर्ध्यावर आणून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम कंपन्या करत आहेत.
रत्नागिरीतील कंपन्यांमध्ये स्थानिक आंबा डावलून मोठ्या प्रमाणात परराज्यातील आंबा येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आंबा डावलून बाहेरच्या आंब्याला प्राधान्य दिले जात असल्याने येथील बाजारपेठ कोसळली आहे.
याकडे गांभीर्याने लक्ष घालून आंबा खरेदी करणाऱ्या या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी कॅनिंगला लागणाऱ्या हापूस आंब्याला किमान प्रतिकिलो ६० रुपये दर देण्यात यावा, कंपन्यांनी जीआय नामांकन घेतले आहे का, ते पाहावे. तसेच हापूस आंब्याची रात्री मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचे प्रमाण वाढत असून रात्री ९ वाजेपर्यंतच आंबा खरेदी करण्यात यावा. शासकीय ९० टक्के अनुदानातून पावस (धोपटवाडी) येथे प्रोसेसिंग युनिट प्रकल्प करण्यात आला आहे. सध्या प्रकल्प पूर्णपणे बंद असून तो तत्काळ सुरू करण्यात यावा.
बागायदारांवरील या अन्यायाविरुद्ध रत्नागिरीतील सर्व आंबा कॅनिंग कंपन्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज आंदोलन करून निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या. या मागण्या तत्काळ मान्य करून सर्वसामान्य शेतकरी, आंबा व्यापाऱ्यांची होणारी लूट थांबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना राजापूरच्या नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे, कोल्हापूरचे शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच स्थानिक बागायतदार उपस्थित होते.







