GRAMIN SEARCH BANNER

गुहागर येथील ज्वेलर्समधील चोरीचा पर्दाफाश ; मुंबईतून चार अट्टल गुन्हेगार गजाआड

Gramin Varta
353 Views

रत्नागिरी: गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील ओंकार ज्वेलर्समध्ये धाडसी घरफोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतील घाटकोपर आणि कुर्ला परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्यासह एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शृंगारतळी येथील ओंकार ज्वेलर्समध्ये १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी आतील शटरही तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. या घटनेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रावून आरोपींचा माग काढला. पोलिसांनी मुंबईत सापळा रचून निशांत सुधीर आंबोकर (वय २१, रा. पंतनगर, घाटकोपर), मोईन शकील शेख (वय २४, रा. गोपाल भवन, घाटकोपर), सुमित कुलदीप चुनियाना (वय २२, रा. कोहिनूर सिटी, कुर्ला) आणि आयुष जितेंद्र घागडा (वय २३, रा. तानसा पाईपलाईन, घाटकोपर) या चौघांना बेड्या ठोकल्या.

या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3368538
Share This Article