तुषार पाचलकर / राजापूर : ब्राझीलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या COP30 जागतिक हवामान बदल परिषदेसाठी भारत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळात राजापूर तालुक्यातील रायपाटण गावचे सुपुत्र आणि भाजप नेते संतोष गांगण यांची निवड करण्यात आली आहे. या मानाच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ब्राझीलच्या बेलिअम शहरात होणाऱ्या या परिषदेत जगातील सर्व देश हवामान बदलाच्या गंभीर समस्यांवर उपाययोजना, करार आणि धोरणांवर सखोल चर्चा करणार आहेत. यावर्षी भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव करीत असून COP मालिकेतील याआधीच्या परिषदेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
हवामान बदलासमोर उभी ठाकलेली जागतिक आव्हाने, ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आवश्यक धोरणे, बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीची उपाययोजना, तसेच आर्थिक सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर या परिषदेत विशेष भर राहणार आहे.
भाजप नेते संतोष गांगण हे केंद्र शासनाच्या अनेक समित्यांवर काम करत असून राष्ट्रीय स्तरावरील विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रीय आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दिशा समितीवरील सदस्य म्हणून स्वच्छ भारत मिशन, वेस्ट मॅनेजमेंट आणि पर्यावरण संवर्धन विषयक नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांतून त्यांचे कार्य विशेष गाजते.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष आमंत्रणासह त्यांना भारत सरकारच्या शिष्टमंडळात स्थान दिले असून १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठित परिषदेत ते कोकणातील एकमेव सामाजिक कार्यकर्ते म्हणून सहभागी होणार आहेत. संसद किंवा विधानसभेचे सदस्य नसतानाही संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत भारत सरकारचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळत आहे.
या परिषदेत “हरित भारत” या संकल्पनेला जागतिक पातळीवर अधिक सक्षमपणे मांडणे, भारताचा शाश्वत आणि सर्वसमावेशक हवामान दृष्टिकोन अधोरेखित करणे तसेच सामूहिक जागतिक प्रयत्नांत भारताचे योगदान ठळकपणे दर्शवणे, यावर भर राहणार आहे. भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजक परंपरा हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगभरासाठी मार्गदर्शक ठरू शकते, हा संदेशही या परिषदेतून पोहोचविला जाणार आहे.
राजापूरच्या संतोष गांगण यांची ब्राझीलमधील COP30 परिषदेसाठी भारताच्या शिष्टमंडळात निवड







