चिपळूण : तालुक्यातील अलोरे देवुळवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा तिच्याच घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही महिला आपल्या घरात एकटीच राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा गणपत चव्हाण (वय ७०, रा. अलोरे देवुळवाडी) या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्या आपल्या सावत्र मुलासोबत, मोहन चव्हाण, एकाच घरात राहत होत्या, परंतु त्यांचा संसार विभक्त होता. त्यामुळे त्या त्यांच्या घरात एकट्याच होत्या. २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काही ग्रामस्थांना घरातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी चौकशी केली असता, सुमित्रा चव्हाण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि खबर देणाऱ्या व्यक्तीने तात्काळ त्यांना शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने अलोरे देवुळवाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वयोवृद्ध आणि आजारी महिलेच्या मृत्यूची कुणालाही वेळेवर माहिती कशी मिळाली नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
चिपळूणमध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेचा घरातच आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
