चिपळूण: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारती उत्तर रत्नागिरी समितीतर्फे चिपळूणमध्ये एक अनोखं रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संघाचे सहा सरसंघचालक – डॉ. के. बी. हेडगेवार, श्री. एम. एस. गोळवलकर (गुरुजी), श्री. बाळासाहेब देवरस, श्री. राजेंद्र सिंह, श्री. के. सी. सुदर्शन आणि सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत – यांच्या व्यक्तिमत्त्वांचं आणि कार्याचं चित्रण रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
या प्रदर्शनाची संकल्पना श्री. संतोष केतकर यांची असून, गोव्याचे प्रसिद्ध रांगोळी कलाकार श्री. विकास फडते, श्री. भूमेश नाईक आणि श्री. दर्शन नाईक यांनीही त्यांच्या सोबत रांगोळी साकारण्यात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, संस्थापक डॉ. हेडगेवार यांचं चित्र हे वाळूशिल्प प्रकारातील असून, ते स्वतः श्री. संतोष केतकर यांनी साकारलं आहे.
हे रंगावली प्रदर्शन चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. दसरा हा संघाचा स्थापना दिवस असल्याने याच दिवशी, म्हणजे २ ऑक्टोबर रोजी, या प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
संस्कार भारतीकडून नागरिक, कलारसिक आणि विद्यार्थ्यांनी या कलात्मक प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संघाच्या ऐतिहासिक वाटचालीचा रंगीबेरंगी पट या माध्यमातून पाहायला मिळणार असून, ही एक अनोखी कला पर्वणी ठरणार आहे.
संघकार्य साकारलं रांगोळीतून; संघ शताब्दीनिमित्त चिपळूणमध्ये अनोखं रांगोळी प्रदर्शन
