तुषार पाचलकर / राजापूर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकसंघ आणि एकदिलाने काम करून सर्व ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा असा निर्धार व्यक्त करत आमदार किरण सामंत यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. विकासाचे राजकारण करणे आणि पक्ष संघटना अधिक बळकट करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष व माजी जि. प. सदस्य आबा आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल आ. सामंत यांनी स्वागत करत हा निर्णय संघटनेला बळ देणारा असल्याचे नमूद केले. राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागात कृषी आणि पश्चिम विभागात पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
तळवडे येथील प्रभावती सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आबा आडिवरेकर यांच्यासोबत हरळ गावच्या सरपंच माधवी पांचाळ यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि उ.बा.ठा पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल झाले. या सर्वांचे स्वागत आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा दुर्वा तावडे, तालुकाप्रमुख दीपक नागले, अविनाश पराडकर, दीपक बेंद्रे, आत्माराम सुतार, पाचल सरपंच बाबालाल फरार, सुरेश ऐनाकर, बाबू वेरवडे, प्रतिक मटकर, शैलेश साळवी, सुनिल गुरव, अमर जाधव, रवींद्र सावंत, संतोष सावंत, विकास रेघे, मंदार सप्रे, गणेश तावडे, श्वेता पवार, विधी पांचाळ, बाळा चव्हाण, बाबा सावंत, जगदीश (सोनू) पाथरे, तुषार पांचाळ, महादेव गुरव, संदीप बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. सामंत म्हणाले, “राजापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. आबा आडिवरेकर यांचा प्रवेश हा पक्षसंघटनेला नवी ऊर्जा देणारा क्षण आहे. पक्षात आलेल्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल. जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतील आणि प्रत्येकाला संधी दिली जाईल. मात्र, पद असो वा नसो, आपण सर्व निष्ठावान शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवून पक्षवाढीसाठी प्रत्येकाने काम करावे.”
“आपल्याला महायुती म्हणून सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत — ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपालिकांपर्यंत भगवा झेंडा फडकवायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे स्वप्न साकार करायचे आहे,” असा कानमंत्रही आ. सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी आबा आडिवरेकर म्हणाले, “शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी संघटना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या विकासाच्या धोरणात सहभागी होण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. यापूर्वी कै. भाईसाहेब हातणकर यांच्यासोबत काँग्रेसमध्ये काम केले. आता शिवसेनेत शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठेने काम करू आणि किरण सामंत यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवू.”
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंदूभाई देशपांडे यांनीही या प्रसंगी उपस्थित राहून आबा आडिवरेकर यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आणि आमदार सामंत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. दीपक नागले, दुर्वा तावडे, दीपक बेंद्रे, मंगेश पांचाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
आबा आडिवरेकर यांच्यासोबत खूशीराम मोरे, विनोद पवार, अमित चिले, संजय गुरव, जगदीश गुरव, सखाराम म्हाडये, संजीव मोरे, जगन्नाथ घडशी, आत्माराम नारकर, नितिन शिंदे, विजय पावसकर, रमजान बलबले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले.
हरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी पांचाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, उ.बा.ठा गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास आप्पा साळवी, सुरेश ऐरणारकर, संदीप बारस्कर, गायत्री साळवी, विहंग खानविलकर, अमीत साळवी, मनोज आडवीलकर, अरविंद लांजेकर यांसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आबा आडिवरेकर यांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार किरण सामंत यांचा महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार







