GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीची ‘राधिका भिडे’ ठरली मराठी पॉपची नवी ओळख; तिच्या गाण्यावर फिदा झाला महाराष्ट्र!

Gramin Varta
478 Views

रत्नागिरी :- मराठी संगीतविश्वात सध्या एक नवं नाव चर्चेत आलं आहे ते म्हणजे राधिका भिडे. तिच्या गोड आवाजाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने ती रसिकांच्या हृदयात घर करून बसली आहे. ‘आय पॉपस्टार’ या संगीत रिएलिटी शोमधून ती प्रकाशझोतात आली असून तिच्या एका गाण्याने अक्षरशः सोशल मीडियावर वादळ उठवलं आहे.

“मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी…” हे तिचं मराठी पॉप गाणं सध्या सर्वत्र गाजतं आहे. मराठी भाषेतील आधुनिक भावगीतांना नवी ओळख देत हे गाणं लोकांच्या मनात रुजलं आहे. राधिकाच्या या गाण्यातून तिच्या आवाजातील माधुर्य, भावना आणि तरुणाईची उर्मी स्पष्ट जाणवते.

२४ वर्षांची ही तरुण गायिका रत्नागिरीची असून सध्या मुंबईत स्थायिक आहे. संगीत तिच्या रक्तातच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण ती प्रसिद्ध गायिका शमिका भिडे हिची लहान बहीण आहे. शमिका प्रमाणेच राधिकाही संगीत क्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी झटतेय.

‘आय पॉपस्टार’च्या मंचावर राधिकाने सादर केलेल्या गाण्याने परीक्षकांसह प्रेक्षकांनाही अक्षरशः थक्क केले. तिचा मराठमोळा लूक आणि आत्मविश्वासपूर्ण परफॉर्मन्स सगळ्यांच्या लक्षात राहिला. काळा ब्लाऊज, जांभळी नऊवारी, कपाळावर चंद्रकोर, सोन्याचे दागिने आणि नथ असा तिचा पारंपरिक पण आकर्षक लूक होता. या परफॉर्मन्समुळे मराठी पॉप संगीताला एक नवं रूप मिळालं आहे. राधिकाचा आवाज निरागस, पण त्यात एक वेगळी जादू आहे. तिच्या गायकीत पारंपरिक मराठीपणा आणि आधुनिकता दोन्ही एकत्र येतात. त्यामुळेच तिचं हे गाणं महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतील प्रेक्षकांनाही भावतं आहे.

राधिका भिडे केवळ ‘आय पॉपस्टार’पुरती मर्यादित नाही. तिने अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांच्या काही प्रसिद्ध कॉन्सर्ट्समध्येही भाग घेतला आहे. या अनुभवामुळे तिच्या स्टेज परफॉर्मन्सला वेगळी झळाळी आली आहे.

एका गाण्याने प्रसिद्ध झालेल्या या तरुण गायिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवरून येतो. काही दिवसांतच तिच्या इंस्टाग्रामवर ७० हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अनेक चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करून तिचं कौतुक करत आहेत.

Total Visitor Counter

3198654
Share This Article