मिलिंद चव्हाण/कडवई: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कडवई आणि रिक्षा मालक चालक संघटना (कडवई-तुरळ-चिखली) यांच्या संयुक्त विद्यमाने कडवई बाजारपेठ परिसरात भव्य स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी आणि रिक्षा संघटनेचे सदस्य यांनी मोठ्या संख्येने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत कडवईच्या वतीने गावात विविध लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याच मालिकेत ग्रामपंचायत आणि रिक्षा मालक चालक संघटना यांनी एकत्र येत हा महत्त्वाकांक्षी स्वच्छता कार्यक्रम राबवला. या मोहिमेअंतर्गत कडवई बाजारपेठ ते ग्रामपंचायत कार्यालय परिसराची तसेच महत्त्वाचे म्हणजे नदीपात्राचीही संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. रिक्षा संघटनेच्या सर्व सदस्यांनी या सामाजिक उपक्रमात अत्यंत उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग घेतल्यामुळे मोहिम यशस्वी झाली.
यावेळी उपसरपंच दत्ताराम ओकटे आणि ग्रामविकास अधिकारी राहुल चौधरी यांनी कडवईतील सर्व व्यापारी वर्गाला आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याचे कळकळीचे आवाहन केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर ग्रामपंचायत कठोर कायदेशीर कारवाई करेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या यशस्वी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी राहुल चौधरी यांनी रिक्षा संघटनेच्या सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले. या स्वच्छता मोहिमेला रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, उपाध्यक्ष संदिप चिले, सहसचिव संदिप येलोंडे, सहखजिनदार राजेंद्र येलोंडे, तसेच सदस्य दिनेश कुवळेकर, बाबू मयेकर, प्रमेश कदम, मोहन कुंभार, बावा मयेकर, राजेंद्र भोजने, तुषार कदम यांच्यासह लिपिक अमित साळुंके, अनंत चोपडे, उमेश शिंदे, नरेंद्र लिंगायत आदी ग्रामपंचायत कर्मचारी आणि रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.







